Sunday, December 28, 2008

जॉईन पॉलिटिक्स ऍज अ करीअर!



राजकारणात सुरुवातीला-उमेदवारीच्या काळात पैसा मिळत नाही (प्रारंभी तो खर्च करावा लागतो) आणि नंतर जो मिळतो तो पुरेसा असतोच असे नाही. पुरेसा पैसा हवा असेल तर मोठे पद मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. एकदा मोठे पद मिळाले (आणि तुमची कोणताही मार्ग चोखाळण्याची तयारी असली तर...) पैशाला ददात नाही. एरवीही आता लोकप्रतिनिधींना बऱ्यापैकी भत्ते-बित्ते मिळतात. अर्थात, त्यावर त्यांचे भागते किंवा ते भागवून घेतात, असे समजण्याचे कारण नाही. परंतु, करीअर म्हणून या क्षेत्रात आलेल्यांना कोणतेही पद मिळण्यापूर्वी पैसा हवा असेल, तर कोणत्या ना कोणत्या प्रकारची दलाली करावी लागते. ती केली तर तुम्ही प्रवाहपतित होणे ठरलेलेच आहे... आणि नाही केली तर तुमचे त्या क्षेत्रात टिकणे अवघड आहे. राजकारणात पैसा थोडाफार तरी लागतोच, हे कटु असले तरी सत्य आहे. त्यामुळे राजकारणात करीअर म्हणून प्रवेश करताना स्वतःचे अर्थकारण स्वतंत्र (म्हणजे राजकारणापासून वेगळे) ठेवले तर जास्त चांगले आणि ते तसेच टिकविले तर त्याहून चांगले. एकदा का तुम्ही उपजीविकेसाठी आणि नंतर चैनीसाठी राजकारणावर अवलंबून राहू लागले की मग कोणत्या-कोणत्या भानगडी कराव्या लागतील याला कोणतीही मर्यादा नाही. दलालांच्या सुळसुळाटातही सचोटीने राजकारण करणारी माणसं आहेतच. त्यांचे वजन आणि नावही मोठे आहे. आपल्याला प्रवाहपतितासारखे राजकारण करायचे आहे, की सचोटी पाळायची आहे, हा ज्याच्या-त्याच्या "चॉईस' चा प्रश्न आहे.
आजपासून सुमारे सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला ऍरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्वज्ञ त्याच्या मूलगामी विचारपद्धतीसाठी प्रसिद्ध होता. ""मनुष्य हा मूलतः राजकीय प्राणी आहे... नीती आणि राजकारणाचा अनन्य संबंध आहे आणि राजकारणातील सहभागातूनच जीवनात खरीखुरी नैतिकता येऊ शकते...,'' असे ऍरिस्टॉटलचे म्हणणे. आजच्या संदर्भात राजकारण आणि नीतिमत्ता ही दोन टोकं वाटतात आणि ऍरिस्टॉटल त्याचा अनन्य संबंध आहे, असे म्हणतो हे जरा खटकतेच. परंतु, व्यापक लोकसहभागातून निर्माण होणारी राज्यव्यवस्था ही खऱ्या अर्थाने कल्याणकारी असते, हे त्याने ज्या तार्किक पद्धतीने मांडले आहे, ते लक्षात घेतले तर राजकारण आणि नीतिमत्ता या वर्तमान विरोधाभासांचा एकत्रित विचार करता येणे शक्य आहे. ऍरिस्टॉटल म्हणायचा की, सकृद्दर्शनी चांगली वाटणारी कोणतीही राज्यव्यवस्था "भ्रष्ट' झाली की अर्थहीन ठरते. एका राजाच्या अखत्यारित चालणारी राज्यव्यवस्था जुलमी होणे अपरिहार्य असते. मोजक्या लोकांच्या हातात सत्ता असेल तरी ती भ्रष्ट होते आणि चौकडीच्या राजकारणाला आणि घराणेशाहीला जन्म देते... आणि बहुसंख्य लोकांच्या सहभागातून जी राज्यव्यवस्था विकसित होते, ती टप्प्याटप्प्याने खऱ्याखुऱ्या लोकशाहीत परिवर्तित होते...!
ऍरिस्टॉटलने "लोकशाही' असा शब्द वापरला नव्हता. त्याने लोकांचे राज्य, लोकसहभाग असलेली राज्यव्यवस्था असे उल्लेख केलेले आहेत... परंतु, त्याला म्हणायचे होते ते असे की, असे लोकसहभागाचे राजकारणच नीतिवान समाज घडवू शकते. मात्र, त्यासाठी समाजाची राजकारणातील सहभागाची मूलभूत ऊर्मी जागी राहिली पाहिजे. वर्तमानाकडे पाहिले तर लोक राजकारणाच्या नावाने बोटेच मोडताना दिसतात. ती तशी त्या वेळीही मोडत असली पाहिजेत. तो काळ सार्वत्रिक राजेशाही-साम्राज्यशाहीचाच होता. परंतु, त्याही वेळी लोकशाहीचा विचार करणारा तत्त्वज्ञ होता, हे विशेष म्हटले पाहिजे. आज जगात काही अपवाद वगळले तर सर्वत्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लोकशाही नांदते आहे. मात्र, तिचे सार्वत्रिक स्वरूप व्यापक लोकसहभागाचे नाही, असे म्हणता येत नाही आणि त्यामुळेच नीतिमत्ता आणि राजकारणाचा संबंध काही केल्या जोडता येत नाही. त्याचा परिणाम असा की, भारतासारख्या खंडप्राय आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणाऱ्या देशातही राजकारण हा मोजक्या लोकांचा धंदा बनला आहे. अलीकडे काही प्रमाणात राजकारणात नवे चेहरे येऊ लागले आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण 115 कोटींच्या देशाचा विचार केल्यास आजही नगण्यच म्हटले पाहिजे. एरवी राजकारणात तरुण मंडळी येताहेत असे म्हणायचे आणि दिसते ते काय तर... तोच मिलिंद देवरा, तोच ज्योतिरादित्य शिंदे आणि तोच सचिन पायलट! ...राजकारणाचे बाळकडू मिळालेल्यांनी राजकारणात येऊ नये, असे नव्हे. मात्र, इतरांनीही या क्षेत्रापासून दूर राहण्याचे कोणतेही कारण नाही. त्याबद्दल आकस बाळगणे उपयोगाचे नाही. नव्या लोकांनी, घरात राजकारणाची परंपरा नसलेल्यांनी राजकारणात आल्याखेरीज या क्षेत्राचे शुद्धीकरण होऊ शकत नाही आणि त्याचा विकासही होऊ शकत नाही. त्यामुळेच राजकारणाच्या क्षेत्राचा करीअर म्हणून विचार करणे आता सुरू केले पाहिजे. "हे असे असले तरी, हे असे असणार नाही...दिवस आमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही...', हा बाणा तरुणाईने बाळगायला आता हरकत नाही. काळ बदललाय्‌. आधुनिक तंत्रज्ञान आणि माहितीच्या अधिकारासारख्या नव्या तरतुदींमुळे भविष्यात राजकारण आणि सत्ताकारण अधिक पारदर्शी होणारच आहे आणि त्याचा पारदर्शी होण्याचा वेग वाढविण्यासाठी तरुणाईने या क्षेत्रात येण्याचा विचार आतापासून केला पाहिजे. तसे केल्याखेरीज या क्षेत्राबद्दलचा आकस (तो सकारण आहे हे मान्य करूनही...) संपू शकत नाही आणि त्याबद्दलचा आकस संपून त्यातील सहभाग वाढल्याखेरीज हा समाज सुखी होऊ शकत नाही.
राजकारण : एक करीअर
डॉ। ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांनी, युवकांनी राजकारणाकडे करीअर म्हणून पाहावे, असे आवाहन अनेकदा केले. ते म्हणायचे, ""मी अनेक ठिकाणी जातो... कुणाला आयएएस व्हायचे आहे, असे विचारले तर अनेक युवक हात वर करतात. अभियंता होण्याचीही अनेकांची तयारी असते. मंगळावर जाण्यास तर सारेच तयार असतात. परंतु, राजकारणात कोण जाणार, असे विचारले तर कुणीच हात वर करीत नाही... खरे तर युवक मंडळी मोठ्या संख्येने राजकारणात येईपर्यंत ते पारदर्शी होऊच शकत नाही. आणि ते पारदर्शी होत नाही तोपर्यंत या देशाला चांगले नेतृत्व मिळू शकत नाही आणि ते मिळेपर्यंत समृद्धीचे लाभ सामान्य माणसांना मिळू शकत नाही. त्यामुळे आता तरुणांनीच राजकारणात करीअर घडविण्याचा चंग बांधण्याची गरज आहे... '' खरोखर तरुणांनी राजकारणात येणे ही भारताची आजची सर्वात मोठी गरज आहे. राजकारणात येण्यासाठी कोणत्याही औपचारिक पदवीची गरज नाही. तयारीने यावे लागते, हे मात्र खरे. राजकारणात पदे भरपूर आहेत. परंतु, कोणतेही पद एकाएकी मिळत नाही. भरपूर उमेदवारी करायला लावणारे हे क्षेत्र आहे. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक तर या क्षेत्रात पदवी उपयोगाची नाही आणि दुसरे म्हणजे त्यामुळेच राजकारणात भरपूर स्पर्धा असते. ही स्पर्धा ही लोकसेवा करायला आलेल्यांमुळे किंवा राजकारणात करीअर घडवायला आलेल्यांमुळे नसते. ती असते राजकीय पुढाऱ्यांच्या सभोवताली पिंगा घालून स्वतःचे स्थान निर्माण करू पाहणाऱ्या किंवा त्यांच्याशी असलेल्या जवळिकीतून पैसे कमावण्याचे मार्ग शोधणाऱ्यांमुळे. त्यांना त्यासाठी किरकोळ पदे हवीच असतात आणि ती त्यांना मिळतातही. अशा लोकांचा सध्या राजकारणात सुळसुळाट आहे. मंत्रालयातले दलाल, वेगवेगळ्या मोठ्या-महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये या ना त्या पक्षाचा झेंडा नावापुरता लावून फिरत दिसणारे लोक हे राजकारण करायला आलेले नाहीत. ते सेवा करायलाही आलेले नाहीत. ते फक्त राजकारणातून मिळणारा मेवा लाटायला आलेले आहेत, हे या क्षेत्राचा करीअर म्हणून विचार करणाऱ्या प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे. आजचे राजकारण हे सज्जनांचे क्षेत्र नाही, हे खरे. परंतु, आजच्या राजकारणात फक्त दुर्जनच उरले आहेत, असेही समजण्याचे कारण नाही. आजही राजकारणात चांगली माणसे आहेत. ती जशी पदांवर आहेत, तशी पदापासून दूरही आहेत. त्यामुळे राजकारणातल्या पदापुरती या क्षेत्रातल्या करीअरला मर्यादा नाही. राजकारणातले करीअर एखाद्या महत्त्वाच्या पदासाठी होऊ शकते, तसे ते एखादी संघटना-दबावगट तयार करून वलयांकित होण्याचा प्रयत्न करणे, एखाद्या वादात मध्यस्थाची भूमिका बजावता येण्यासाठी आवश्यक ती तयारी करणे, राजकीय व निवडणुकीचे डावपेच व त्यांची आखणी-अंमलबजावणी या विषयात अधिकार मिळविणे इत्यादी अनेक प्रकारांचे करीअर या क्षेत्रात करता येणे शक्य आहे. आपण एकदम निवडणूक लढू आणि आमदार किंवा खासदार होऊ, असे कुणाला वाटत असेल तर ते चूक आहे. लॉटरी एखाद्याचीच लागते आणि "एकलव्यां'ना राज्य मिळत नसते, हा जगाचा नियम आहे. राजकारण त्याला अपवाद नाही. राजकारण हे आत्यंतिक अनिश्चिततेचे क्षेत्र आहे. ते डावपेचांचे आणि तीव्र रागालोभांचे क्षेत्र आहे. परंतु, त्याच वेळी संयमी, लाघवी वाणी असलेल्या लोकांचीही या क्षेत्रात चलती आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपली वैचारिक बैठक पक्की असणे, आपले ध्येय निश्चित असणे, ध्येयाप्रती मार्गक्रमण करताना चढ-उतार येणार हे गृहीत धरून संयम बाळगणे, प्रत्येक बारकावा समजून घेणे, पुरेसा वेळ देणे, अभ्यास करणे, चिंतन करणे, लोकसंग्रह करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टींचा योग्य वेळी वापर करण्याची हातोटी तयार करणे या गोष्टी राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. मात्र, त्यासाठी महाविद्यालयीन अभ्यासक्रम नाहीत. त्यामुळे यशस्वी राजकारण्यांचे निरीक्षण करूनच प्रारंभिक धडे घेणे व हळूहळू शिकत जाणे याखेरीज दुसरा मार्ग नाही. राजकीय पाठबळ किंवा घराण्याची परंपरा नसलेल्या लोकांचे स्वागत करण्याची राजकारणात पद्धत नाही. मात्र, एखादा माणूस उपयोगाचा आहे अशी खात्री पटली तर त्याला दूर लोटण्याचीही राजकारणात पद्धत नाही. आपण आपल्या विचारांच्या बैठकीला अनुकूल असलेल्या पक्षातील नेत्यांच्या उपयोगाचे ठरण्यात यशस्वी ठरू शकतो काय, असा प्रश्न स्वतःला विचारून कामाला सुरुवात केली पाहिजे. तसे नसेल तर ती कुवत अंगी निर्माण केली पाहिजे. त्यासाठी माध्यमांचा वापर करायला शिकले पाहिजे. नुसते अधिवेशनापुरते फलक लावून नेत्यांचे स्वागत करणे हे राजकारणातले करीअर असू शकत नाही. लोकसभा ते ग्रामपंचायत असा विचार केला तर जिल्हा परिषदा, पालिका-महापालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदा, सोयायट्या, महामंडळे, सहकारी संस्था अशा असंख्य ठिकाणी लक्षावधी लोक निर्वाचित होत असतात. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर निर्वाचित लोकप्रतिनिधींची अशा यंत्रणांवरची पदे लाखात जातील एवढ्या मोठ्या संख्येने आहेत. या पदांचा विचार करून आणि छोट्यातले छोटे पद मिळवून जो पुढे वाढण्याचा विचार करेल, त्याच्यासाठी या क्षेत्रात जागा आहे. आज नसली तरी ती उद्या निर्माण होणारी आहे. आजचे बहुतांशी मंत्री-मुख्यमंत्री-खासदार-आमदार हे कधी ना कधी जि.प., पं. स., ग्रामपंचायत, जिल्हा बॅंक अशा यंत्रणेत सदस्य वा पदाधिकारी होते आणि त्यांनी स्वतःला मोठ्या कष्टाने इथवर आणले, हे आपल्याला समजले पाहिजे. प्रत्येकाबद्दल नव्हे, तरी अनेक लोकांबद्दल तसे घडू शकते. दुर्दैवाने, तरुण पिढीला राजकारणात आणण्यासाठी कोणत्याही पक्षाकडून वा यंत्रणेकडून वेगळा प्रयत्न केला जात नाही. ते गरजेचे आहे, असे प्रत्येक जण म्हणतो. ते खरेही आहे. राजकारणात नव्या लोकांची खरोखर गरज आहे. कारण तिथे नव्या लोकांना "स्कोप' आहे आणि ते आले तरच या देशातील सामान्य जनतेला थोडीफार "होप' आहे.


शैलेष पांडे
9881717803

२४ देक २००८ नाग तरुण भारत

No comments:

Post a Comment

....


मी एक पत्रकार आहे. आज प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायीक बनली आहेत; आणि पत्रकारही. परिणामी या राष्ट्रासमोरील समस्या यथार्थपणे समाजासमोर आणल्या जात नाहीत. भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व.

स्वामी विवेकानंद म्हणतात हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हे एक कटु सत्य आहे.

विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, "जीवनात आव्हानांचे भारी महत्व असते. जीवनात आव्हाने नसतील तर मनुष्य निष्क्रीय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परन्तु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील तर पुढील दोन पैकी एक गोष्ट होऊ शकते...

i. आव्हाने समजुन घेतली नाही तर त्या आव्हानान्ना बळी पडून नष्ट व्हावे लागते.

किंवा

ii. आव्हाने समजुन घेवून त्यांना प्रतिसाद दिला तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''

जी गोष्ट मनुष्याला लागु पड़ते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागु पड़ते.

या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरु आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे. हिन्दुन्मधे न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न तथाकथित धर्मनिरपेक्षवादी (दुर्) बुद्धिवादी करीत आहेत. त्यामुले या समाजासमोरिल आणि राष्ट्रासमोरील आव्हनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

...... सिद्धाराम भै. पाटील