Tuesday, February 10, 2009

हतबल जिल्हा प्रशासन

भीमा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू नेणाऱ्या तस्कारांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला झाला. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे हा प्रकार घडला. असा प्रकार प्रथमच घडलेला नाही. महिन्यापूर्वी एका तडफदार महिला अधिकाऱ्यावरही असाच हल्ला झाला होता. खरे तर त्याचवेळी वाळू तस्कारांच्या मुसक्या बांधल्या असत्या तर जिल्ह्यात त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली नसती, पण ती झाली याचा अर्थ हे वाळुतस्कर आता कोणालाच जुमानत नाहीत आणि त्यांना कोणाची भीती वाटत नाही. ते एवढे निगरगट्ट झाले ते एका रात्रीतून झालेले नाहीत. नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्याचे नियम ठरलेले आहेत. रात्री वाळू उपसा करण्यास मनाई आहे. भीमेच्या पात्रात अनेक ठिकाणी रात्रीचाच उपसा होतो. यंत्रे वापरण्यास मनाई आहे. सर्वत्र यंत्रेच वापरली जातात. ट्रकमध्ये वाळू किती भरावी याचेही नियम आहेत. प्रत्येक ट्रकमध्ये त्यापेक्षा अधिक वाळू भरलेली असते. याचा अर्थ प्रत्येक नियम पायदळी तुडवूनच वाळूचा धंदा होतो. गेली 10-12 वर्षे तो बिनबोभाट चालू आहे. आज वाळुतस्कर न घाबरता सरकारी अधिकाऱ्यांवर हात चालवतात. त्यांच्या वाहनांची मोडतोड करतात. हे धाडस त्यांच्या अंगी आले. कारण गेली 10-12 वर्षे हप्ता देऊन त्यांनी तोंड बंद केले होेते. नवे अधिकारी प्रामाणिक निघाले किंवा वरिष्ठाच्या आदेशाने कारवाई करणे भाग पडून कारवाई केली तर असा प्रसंग ओढवतो.
गेल्या 2-3 वर्षांत वाळुतस्करी प्रमाणाबाहेर बोकाळली आहे. सरकारी अधिकारी आंधळे, मुके, बहिरे असतात. त्यांना वाळूचे ट्रक दिसत नाहीत. अनेक गावांत ग्रामस्थांनी ट्रक पकडले. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी शंभर तक्रार अर्ज दिले. जिल्हा प्रशासन आतापर्यंत दखलच घेत नव्हते. वाळूच्या ट्रकखाली एका तरुणाचा मृत्यू झाला. प्रकरण पद्धतशीर दडपण्यात आले. हे कसे झाले याचे पोलीस अधीक्षकांकडे उत्तर आहे? परप्रांतातील ट्रकखाली सापडून कोणी मृत्यू पावल्यास माल घेऊन जाणारा ट्रक महिनोनमहिने जप्त करून चौकीत आणून ठेवला जातो. येथे अपघाताचीच नोंद नाही तर वाळूचा ट्रक जप्त करण्याची हिम्मत पोलिसांत कोठून येणार? आणखी एका प्रकरणात गावकऱ्यांनी वाळूचे 4 ट्रकपकडले. पुढे काहीच झाले नाही. नागरिकांची स्मृती तोकडी असते. हे प्रकार विसरून जातात. सरकारच्या मदतीस गेलेले नागरिक मात्र वाळू तस्करांच्या रोषाचे धनी होतात. सध्या महसूल आणि पोलीस खाते वाळू तस्करांचे हप्ते खाऊन त्यांचे मिंधे बनले आहेत. कारवाई करण्याची ताकद त्यांच्यात उरलेली नाही. नागरिक एकत्र येणे कठीण असते. त्यातून एकत्र आले तरी सरकारी यंत्रणेचा थंडा प्रतिसाद पाहून नसती बिलामत कोण ओढवून घेणार. सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा दुसरा प्रकार घडल्यावर आता तरी जिल्हा प्रशासनाने जागे होण्याची आवश्यकता आहे. वाळूची तस्करी रोखणे यात अवघड काहीच नाही. त्यासाठी काही तहसीलदार बडतर्फ करायला हवेत आणि ट्रक कोणाच्या मालकीचा याचा विचार न करता त्यांच्या सहाही चाकातील प्रथम हवा सोडणे आणि ट्रकमधील वाळू परत नदीच्या पात्रात टाकायला भाग पाडणे. या सोपस्कारानंतर खटला, अशी निर्भिड कारवाई केली तरच भीमेचे शोषण थांबेल.
वाळू प्रमाणे रॉकेलच्या बाबतीतही जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. या व्यवहारात कोण गुंतले आहेत, त्यांची नावे सर्वतोमुखी आहेत. फार आरडाओरडा झाला की, एखादा टॅंकर पकडला जातो. ड्रायव्हर, क्लिनरच्या पलीकडे कधी कोणावर कारवाई होत नाही. सूत्रधारापर्यंत जायची पुरवठा खात्याची कधीच तयारी नसते. आजही आठवड्यातून एकदा रॉकेलचे वाटप होते. त्यादिवशी नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. सर्वांना रॉकेल मिळाले असे कधीच होत नाही. असे का? त्यांच्या नावाने वितरित झालेले रॉकेल जाते कोठे? 300-400 लिटर निळे रॉकेल पकडल्याच्या बातम्या पुरवठाखाते वृत्तपत्रांना देते तेव्हा कीव येते. एका टॅंकरमधून दुसऱ्या टॅंकरमध्ये रॉकेल घालताना जेवढे सांडते तेवढे पुरवठा खाते पकडते असे म्हणतात. रॉंकेल तस्करीची बातमी देणाऱ्या वार्ताहरांना बेदम मारहाण होते. वार्ताहर तरी कितीदा आवाज उठवणार! रोज हजारो लिटर्सचा काळाबाजार सध्या होत आहे. पुरवठा खात्यातील अधिकारी गब्बर होत आहे. गरीब जनता 7 रु.चे निळे रॉकेल मिळाले नाही म्हणून शिव्याशाप देत आहे. वाळूप्रमाणे रॉकेल तस्करांनीही जिल्हा प्रशासनाला आपल्या दारात बांधून ठेवले आहे. ही लज्जास्पद स्थिती बदलणे कर्मकठीण नाही. फक्त त्यासाठी इच्छाशक्ती हवी आहे. रॉकेलचे टॅंकर कोठे रिकामे होतात. निळ्याचे पांढरे करण्याची प्रक्रिया कोठे चालते. कोणत्या रोडवरचा कोण केरोसिन किंग आहे, याची माहिती शोधण्याची गरजच नाही. या क्षेत्रातील सर्वांना ती मुखोदगत आहे. पुरवठा खाते, महसूल खाते आणि करमणूक खाते ही जिल्हा प्रशासनातील सर्वाधिक सडलेली खाती आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मिळून या समाजद्रोह्यांचा बंदोबस्त कधी करणार याची नागरिक प्रतीक्षा करीत आहेत.

....


मी एक पत्रकार आहे. आज प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायीक बनली आहेत; आणि पत्रकारही. परिणामी या राष्ट्रासमोरील समस्या यथार्थपणे समाजासमोर आणल्या जात नाहीत. भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व.

स्वामी विवेकानंद म्हणतात हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हे एक कटु सत्य आहे.

विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, "जीवनात आव्हानांचे भारी महत्व असते. जीवनात आव्हाने नसतील तर मनुष्य निष्क्रीय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परन्तु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील तर पुढील दोन पैकी एक गोष्ट होऊ शकते...

i. आव्हाने समजुन घेतली नाही तर त्या आव्हानान्ना बळी पडून नष्ट व्हावे लागते.

किंवा

ii. आव्हाने समजुन घेवून त्यांना प्रतिसाद दिला तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''

जी गोष्ट मनुष्याला लागु पड़ते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागु पड़ते.

या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरु आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे. हिन्दुन्मधे न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न तथाकथित धर्मनिरपेक्षवादी (दुर्) बुद्धिवादी करीत आहेत. त्यामुले या समाजासमोरिल आणि राष्ट्रासमोरील आव्हनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

...... सिद्धाराम भै. पाटील