Tuesday, January 20, 2009

सीमावादात राजकारण

गेली 50 वर्षे भिजत पडलेला सीमाप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लातूरमध्ये कर्नाटक परिवहन मंडळाची एक बस जाळल्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र आंतरराज्य बसवाहतूक सध्या बंद आहे. रोज सुमारे 200 बसेस ये-जा करतात. त्या रद्द झाल्याने महाराष्ट्र परिवहनचे रोज लाख रु. चे नुकसान होत आहे तर कर्नाटक परिवहनचे होणारे नुकसान वेगळेच. सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटायला हवा आणि कोणावरही कोणत्याही भाषेची सक्ती होऊ नये याबाबत दुमत होण्याचे कारणच नाही. खरे तर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणणाऱ्यांनी त्यावेळीच बेळगावचा प्रश्न सोडवायला हवा होता. त्यावेळी केंद्रात मुंबईत आणि म्हैसूरमध्ये कॉंग्रेस पक्षाचेच राज्य होते. तरी देखील कॉंग्रेस पक्षाने काश्मीर प्रश्नाप्रमाणे हा प्रश्न नुसता चिघळत ठेवला. 1967 साली सेनापती बापट यांनी या प्रश्नावर आमरण उपोषण सुरू केले तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या प्रश्नात तातडीने तोडगा काढायचे आश्वासन देऊन सेनापती बापट यांना उपोषण सोडायला लावले होते. त्या गोष्टीला आता 42 वर्षे झाली. कॉंग्रेस पक्षाची ती तातडी अद्याप निर्माणच झाली नाही. सीमाप्रश्न हे कॉंग्रेस पक्षाचे पाप आहे. सत्तेत वाटा मिळतो असे पाहिल्यावर सीमाप्रश्नाची तड न लावता कॉंग्रेसबरोबर सहकार्य करणारे या पापात सहभागी आहेत. या गोष्टी सोईस्करपणे विसरून आज एकदम सीमाप्रश्नावर हळी द्यायची यामागे सीमाप्रश्नाची आच शून्य असून, निव्वळ राजकारण आहे. राजकारण करायला काहीच हरकत नाही. शेतकरी कामगार पक्षाला आता अस्तित्व टिकविण्यासाठी अशा एखाद्या प्रश्नांची आवश्यकता आहेच. हे राजकारण करताना कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करणे, कर्नाटकात भाजपा सरकार बडतर्फ करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे आणि शिवसेनेला भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडायचा सल्ला देणे या सर्व विचारामागे सीमाप्रश्न सोडवण्याचा तोडगा कोठेच दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. आज तरी चित्र असे आहे की, महाराष्ट्रात सेक्युलर, डावे, मार्क्स लेनिनचे भगतगण यांचा साफ कचरा होणार आहे. अशावेळी भाजपा-सेना युती तोडणे हे त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे.
कर्नाटक हे दक्षिण भारतातील राज्य असून, दक्षिणेत भाजपाला स्थान नाही. त्याचा जोर नर्मदेच्या पलीकडे असे म्हटले जात होते. अशावेळी कर्नाटकात भाजपाने स्वबळावर सत्ता मिळविल्याने सेक्युलरांना तोंड लपवायला जागा उरली नाही. आता विधानसभेच्या 8 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यातील एकही जागा भाजपाकडे नव्हती. आता त्यातील 6 जागा मिळाल्या. कर्नाटकातील भाजपाच्या वाढत्या प्रभावाने ज्यांच्या पोटात मुरडा झाला ते सीमावादाचे निमित्त करून कर्नाटकात भाजपाला सत्ताभ्रष्ट करण्याचे स्वप्न पाहत आहेत. सीमाभागातील मराठी बांधव गेली 50 वर्षे हा अन्याय सहन करीत आहेत. बी.डी. जत्ती, निजलिंगप्पा, देवराज अरस, वीरेंद्र पाटील, बंगारप्पा, गुंडुराव, धरमसिंह, कुमारस्वामी यांची सीमाप्रश्नावरील भूमिका आणि येडीयुरप्पा यांची भूमिका यात तसूभर फरक नाही. यापैकी कोणाचा राजीनामा मागितला नाही. भाजपाचा मुख्यमंत्री होताच यांना कंठ फुटला आहे. तीन वर्षांपूर्वी बेळगावचे महापौर विजय मोरे यांना बंगलोरमध्ये मारहाण होऊन कपडे फाडून तोंडाला काळे फासण्यात आले. त्यावेळी कॉंग्रेसचे धरमसिंह मुख्यमंत्री होते. आत्ताच्या मागण्या त्यावेळी का करण्यात आल्या नाहीत. 2007 साली कुमारस्वामी यांनी बेळगावमध्ये विधानसभा अधिवेशन घेऊन नव्या विधानभवनाची कोनशीला बसवली. त्यावेळीही निदर्शने करणाऱ्या मराठी भाषकांवर लाठीमार झालाच होता. धरमसिंह पडले कॉंग्रेसचे आणि कुमारस्वामींचा पक्षच सेक्युलर त्यामुळे नरड्यात हाडुक अडकल्याप्रमाणे वाचा बंद होती. आता येडीयुरप्पांच्या रूपाने भाजपा सत्तेवर येताच हाडुक नरड्यातून निघाले आणि राजीनामा द्या, राष्ट्रपती राजवट आणा अशी कोल्हेकुई सुरू झाली आहे.
दोन्हीकडे भाजपा येऊ दे
सीमाप्रश्नावर खरोखर तोडगा काढायचा असेल तर मुंबई आणि बंगलोरमध्ये एकाच पक्षाची राजवट असणे आवश्यक आहे. केंद्रातही त्याच पक्षाचे सरकार असेल तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल. महाराष्ट्र-कर्नाटकचे नेते केंद्राची मदत न घेताही प्रश्न सोडवू शकतात. गेल्या 50 वर्षांत कॉंग्रेसला हे करणे सहज शक्य होते. आता हा कोळसा उगाळण्यात अर्थ नाही. अशक्य वाटणारे घडले आहे. कर्नाटकात भाजपाची सत्ता आहे. महाराष्ट्रातही भाजपा शिवसेनेची सत्ता आली तर उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि येडीयुरप्पा एकत्र बसून तोडगा काढतील. त्यासाठी आता महाराष्ट्रात युतीचे राज्य येणे आवश्यक आहे. कै. हरिभाऊ पाटसकर यांनी खेडे हा घटक धरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेची नव्याने आखणी करण्याचा तोडगा सुचवला होता. लोहमार्ग ही सीमा धरून बेळगावची फाळणी हाही तोडगा आहे. त्यासाठी एकत्र एकदिलाने चर्चा व्हायला हवी. कॉंग्रेसच्या राज्यात ते झाले नाही ते भाजपाच्या राज्यात होऊ शकेल. मात्र न्यायालयाच्या माध्यमातून काहीच होणार नाही. रामजन्मभूमीचा प्रश्न अजून न्यायालयातच आहे. रामसेतूही न्यायालयात आहे. संवेदनशील प्रश्नावर न्यायालयाचा निर्णय एका पक्षाला नेहमीच अमान्य होणार. मराठी भाषकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, गेली 40 वर्षे बेळगाव महापालिका आणि 5 विधानसभा मतदारसंघ मराठी भाषकांच्या हाती होते. आता त्यापैकी काहीही राहिलेले नाही. 2008 साली बेळगाव महापालिकाही कन्नड भाषकांच्या हाती गेली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नावाने शेकाप, समाजवादी, कम्युनिस्ट यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. म्हणून सीमाभागातील मराठी भाषक आता पूर्णपणे पराभूत झाले. ही जुनी जळमटे काढून दोन्ही राज्यांत भाजपा हाच सीमाप्रश्न सुटण्याचा एकमेव मार्ग आहे.

1 comment:

 1. Siddhram B Patil is very positive about BJP. I think he is BJP worker and wants shatpratishat BJP all over world.
  He has not seen Yediyurappas adamant attitude about Belgaon. He is very hopeful about BJP.
  But the truth is
  IT IS COMPLEX ISSUE.
  IT NEEDS TO RESOLVED STRONG POLITICAL WILL.
  WHICH BJP ALSO LACKS.

  ReplyDelete

....


मी एक पत्रकार आहे. आज प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायीक बनली आहेत; आणि पत्रकारही. परिणामी या राष्ट्रासमोरील समस्या यथार्थपणे समाजासमोर आणल्या जात नाहीत. भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व.

स्वामी विवेकानंद म्हणतात हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हे एक कटु सत्य आहे.

विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, "जीवनात आव्हानांचे भारी महत्व असते. जीवनात आव्हाने नसतील तर मनुष्य निष्क्रीय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परन्तु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील तर पुढील दोन पैकी एक गोष्ट होऊ शकते...

i. आव्हाने समजुन घेतली नाही तर त्या आव्हानान्ना बळी पडून नष्ट व्हावे लागते.

किंवा

ii. आव्हाने समजुन घेवून त्यांना प्रतिसाद दिला तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''

जी गोष्ट मनुष्याला लागु पड़ते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागु पड़ते.

या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरु आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे. हिन्दुन्मधे न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न तथाकथित धर्मनिरपेक्षवादी (दुर्) बुद्धिवादी करीत आहेत. त्यामुले या समाजासमोरिल आणि राष्ट्रासमोरील आव्हनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

...... सिद्धाराम भै. पाटील